शुक्रवार, अप्रैल 02, 2010

मुंबैकर..........

मुंबैकर..........
आंदण म्हणून गेलेल्या बेटावर रहाणारा मुंबैकर..
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात हिरिरीने भाग घेणारा मुंबैकर..
स्वातंत्र्या नंतर मुंबईला महाराष्ट्रातच राहू द्या म्हणणारा... संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रक्त सांडणारा मुंबैकर..
अनेक मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दींचा साक्षीदार मुंबैकर...
डाव, प्रतिडावाचे राजकारण स्थितप्रज्ञ पणे पहाणारा मुंबैकर... प्रसंगी त्यात भाग घेणारा मुंबैकर...
अनेक सामाजिक चळवळी चालू करणारा... मुंबैकर
आधुनिकता चटकन अंगी बाळगणारा मुंबैकर....

मुंबैकर...

सिनेनट नट्यांचे चाळे झेलणारा... अन् कधी कधी त्यांचे लाड करणारा मुंबैकर...
लाडक्या सुनील च्या शतकी खेळीचा मनमुराद आनंद लुटणारा... अन् त्याहूनही लाडक्या सचिनच्या टोलेबाजीत वानखेडेवर बेहोष होणारा मुंबैकर...
जागेची गैरसोय बाजूला ठेवून आगंतुक पणे आलेल्या पाहुण्याचा यथोचित पाहुणचार करणारा मुंबैकर...
सात सदतीस ची फास्ट पकडून ऑफिस गाठणारा अन् त्याचवेळी घरच्या जबाबदार्या सांभाळणारा...मुंबैकर...
समोर समुद्राच्या लाटांच्या अन् मागे आख्ख्या दुनियेच्या साक्षीने वरळी सी फेस वर प्रेमालाप करणारा बिनधास्त मुंबैकर..
लोकलच्या विस्कळित सेवेने संतप्त होऊन दंगा करणारा मुंबैकर..
बिहार, यूपी वाल्या भैयाला आपल्यात सामावून घेणार मुंबैकर..
सिद्धिविनायकासमोर रांगा लावून माझे जगणे सुसह्य कर असे मागणं मागणारा मुंबैकर...
लालबागच्या "राजाला" मोरया म्हणत मिरवणारा मुंबैकर...
चार पैसे जास्त आले तर ऐश करणारा मुंबैकर...
वीक एंड ला पुणेकरापेक्षा लोणावळा खंडाळ्याला जास्त गर्दी करणारा मुंबैकर...
धांदल करू नका म्हणणारा मुंबैकर...
मिनर्व्हाला शोलेचे खेळ सतत सहा वर्षे पहाणारा मुंबैकर..
भाईगिरीशी सोयरसुतक नसलेला पण त्यात होरपळलेला मुंबैकर..
दोन मोठे अनेक छोटे बॉम्बस्फोट पचवून परत उभा रहाणारा धीरोदात्त मुंबैकर...
२६ जुलैच्या पावसात रोड डिव्हायडरला दोर लावून, जाणार्यांची सोय करणारा डोकेबाज मुंबैकर..
त्याच पावसात माणुसकीने वडा पाव विकणारा मुंबैकर..
आणि आता थोडा जरी पाऊस झाला तरी ज्याच्या पोटात धस्स होते तो मुंबैकर...

तर मुंबैकरा तुला या परभणीकराचा सलाम...
http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=119403&post=809382#POST809382

मरिना बीचवरची ती रम्य संध्याकाळ ...

स्थळ्: मरिना बीच (चेन्नई)
वेळ्: संध्याकाळची
साल्: १९८८
पात्रे: २५ मर्द मराठा..

... तर त्याचं असं झालं की आम्ही " educational tour " (ह्यात काय करतात हे सगळ्यांना माहित आहे..) वर "साऊथ" ला गेलो होतो.. बस आमच्याच college ची होती..
तिरुपतीच्या बालाजी चे दर्शन घेऊन (इथुन पुढे beautiful "दर्शने" होऊ दे असे मागणं मागून) आम्ही चेन्नई (तेव्हाचे मद्रास) कडे कूच केले.
तिथल्या agriculture college च्या कुठल्याश्या hostel वर आमची व्यवस्था (कशीबशी) "लावून" दिली होती... (रात्री डासांनी आमची "अवस्था" केली होती.) असो..
दुसर्‍यादिवशी सकाळचे सगळे कार्यक्रम "व्यवस्थित" आटोपून.. (हो व्यवस्थितच... प्रवासात सकाळी व्यवस्थित "होत" नसते...) महाबलीपुरम, सर्पोद्यान आणि इतर काही ठिकाणे पाहून आम्ही मरिना बीचवर संध्याकळी सहाच्या सुमाराला दाखल झालो... बस तिथल्या वाळूतच पार्क करून ठेवली... एव्हाना आमच्यातल्या बर्‍याच जणांचा उत्साह वाढला होता.. त्यातून ( I mean त्यांच्या चाळ्यांतून) ते नक्कीच माकडाचे वंशज आहेत हे प्रकर्षाने जाणवत होते... (अशा लोकांची खरी गरज इथेच असते.. तेवढीच गम्मत..). आम्ही तिकीट काढून आत गेलो.. आत गेल्यावर आधी डोसा, ईडली इ. जे काही समोर येईल ते हादडले.. आता पोटात गेले होते... "कुछ खत्रा (इकडच्या भाषेत "जबरी") करके दिखाने का" चा किडा डोक्यात वळवळायला लागला... तसेच इकडे तिकडे भटकत राहिलो... कुठेच काही " beautiful " दिसले नाही... शेवटी एके ठिकाणी थबकलो.. तिथे फर्माईशी orchestraa चालू होता. थोडावेळ थांबलो.. म्हणलो सुनेंगे कुछ.. (इथे मात्र " beautiful " होते..).. सगळ्या फर्माईशी "यन्गडतु" गाण्यांच्या... ओ की ठो कळत नव्हते... आमच्यातला एक जण हिम्मत करून stage वर गेला अन् विचारले " will u sing hindi songs? " "येस" असे उत्तर आले... लग्गेच "एक दो तीन" ची फर्माईश केली गेली (त्यावेळी आपल्या दिक्षितबाई भलत्याच जोरात होत्या). त्यांनी मान्य केली.. आम्हाला भलताच आनंद झाला..
आम्ही वाट पाहू लागलो.. हे आता म्हणतील.. मग म्हणतील.. आमच्या समोर इतरांची पसंती स्वीकरली जाऊन त्यांची गाणी (यंगडतु..) म्हणली जात होती पण "एक दो तीन" चा काही "नंबर" लागत नव्हता.. आमच्यातला एक जण परत त्यांना विनंती करून आला... ते पण "लग्गेच" म्हणतो असे म्हणाले... आम्ही खुश... परत एक नवीन यंगडतु फर्माईश... ती पण स्वीकारली गेली... आम्ही संतप्त... त्यातच गर्दीतल्या एकाने सुनावले "तुमारा गाना वो नई गाता... हमारा तमील गाना ही वो गायेगा.. हम सब इतने लोग है हमारा उसको सुनना पडेगा.. तुम्हारा कौन सुनेगा?"... त्यातच त्यानी आम्हाला खिजवण्यासाठी परत एक नवी फर्माईश केली... ती स्वीकारली गेली सुद्धा... झाले आमची टाळकी फिरली ३०० च्या जमावा समोर आम्ही २५ जण "तेजाब", "तेजाब", "मोहिनी", "मोहिनी" ओरडू लागलो अन् एकच गोंधळ सुरु झाला त्यांना त्यांची गाणी ऐकता येईनात.. शेवटी.. "ओ तुम चुप बैठो.. तुमारा गाना वो गानेवाला है" असे कुणी तरी सांगितले. आम्ही ऐकले तो खरंच त्याने एक दो तीन चालू केले... मग आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. मग जो नाच चालू झाला... २५ लोक "तुमच्यावर आम्ही तुमच्या गल्लीत विजय मिळवला आहे" याच भावनेने नाचत होते.. ते गाणे बाजूलाच राहिले... शेवटी ते गाणे संपले अन् बीच ची वेळ संपली आम्ही सगळे बाहेर आलो. बाहेर पडत असताना एका तामिळी टोळक्याने आम्हाला विचारले "तुम्ही कुठचे?" आम्ही, "महाराष्ट्र" असे ठणकावून सांगितले. "तुम लोग ग्रेट हो यार" त्यांच्यातला एक जण.. आम्ही बाहेर आलो रात्रीचे ८ वाजले होते... जाम भूक लागली होती.. आम्ही सर्वजण घामाने निथळत होतो अन् त्यातच एक शुभ वार्ता कळाली... बस वाळूत फसली आहे.. डोक्याच्याही वर असलेली मागची खिडकी ("आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग") आता छातीच्याही खाली गेली होती. पोटात भीतीचे गोळे आले..
बाहेर आलेले "ते" लोक म्हणत होते "आत फार माज आला होता ना तुम्हाला? घ्या आता..." आम्हाला हसत होते... त्यातला एकहि जण आम्हाला मदत करण्यासाठी पुढे येत नव्हता... अगदी १०० / २०० चा जमाव जमला होता आमच्या भोवती. आमची कशी जिरली याचा आनंद घेत होता..
आम्ही सुरुवातीला बसला धक्का मारण्याचा प्रयत्न केला...बस ढिम्मच...तिकडे ड्रायव्हर गिअर वर गिअर बदलत होता...
मागची दोन्ही चाके जागीच गरारा फिरत होती... वाळू बकाबका नाकातोंडात जात होती... पण बस काही हलत नव्हती..
एकाने सांगितले... चेन्नईला जा. तिथून क्रेन आणा अन् बस काढा.
शेवटी सगळ्यांनी ठरवले... आपणच बस काढायची...सगळे बसच्या मागे आले..."हर हर महादेव..." "जय भवानी जय शिवाजी.." च्या घोषणांनी तो परिसर परत दणाणला..आता चार पाचशे लोक तरी जमले होते...एक बाप्या मदतीला येईल तर शपथ...आमच्या घोषणा चालूच होत्या... आता बस जागीच हलत होती... आम्ही धक्के देऊन बसला जोरजोरात हलवत होतो.. डोक्यात, कानात नुसती वाळूच वाळू झाली होती...वाळू थुंकून थुंकून बेजार झालो होतो...शर्टात वाळू गुदगुल्या करत होती..आता बस बरीच मोकळी झाली होती...आता एक शेवटचा भीमटोला द्यायचे ठरले.. परत एकदा "हर हर महादेव" ने परिसर दणाणला...जोरदार धक्का दिला गेला अन् बस दुसर्‍या क्षणी बाहेर आली
आमचा आनंद गगनात मावत नव्हता... नुसत्या उड्या मारत होतो...एकमेकांना मिठ्या मारत होतो... हेच दाखवून देत होतो की आम्ही मर्द मराठा आहोत...कुणावाचून आमचे अडत नाही...जमलं तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्याशिवाय असा आमचा बाणा असतो...जिथे जाऊ तिथे स्वत:चे स्थान निर्माण करतो...
तिथल्या एका टोळक्याने चक्क हात जोडले (मगाशी तुम्ही कुठचे असे विचारणारे हेच ते टोळके..)
शेवटी त्याच गर्दीतल्या तिघाचौघांना घेऊन आम्ही चेन्नई ला प्रयाण केले...
फ्रेश होऊन जेवून झोपलो... पण झोप येत नव्हती...
त्यांच्या नाकावर टिच्चून केलेला एक दो तीन चा नाच डोक्यातून जात नव्हता..


http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=119403&post=809382#POST809382

बुधवार, नवंबर 08, 2006

देवघर....

आपल्या घरात अनेक खोल्या असतात. कोणाला बैठक आवडते, कुणाला बेड तर कुणाला स्वैपाकघर..

मला विचाराल तर मला देवघर आवडते....

देवघराची वेगळी अशी खोली क्वचितच असते. कुणाचे देवघर स्वैपाकघरात तर कुणाचे त्याच्याबाजूला तर कुणाचे चक्क बेडरूम मध्ये... कुठेही असो पण देवघर असणे महत्वाचे. पण ते नुसतेच असून चालत नाही तर देवपूजा करणारा ही लागतो.

असं म्हणतात की घरातल्या कर्त्या पुरूषाने देवपूजा करावी अन कर्त्या स्त्री ने त्याला मदत करावी म्हणजे पूजेची तयारी करावी. फुले आणावीत, हार करावेत, गंध काढून ठेवावे, नैवेद्याचे पदार्थ करावेत, उदबत्ती, निरांजन, वाती, कापूर, धूप इ. काढून ठेवावेत, पूजेची भांडी स्वच्छ धुवून ठेवावीत इ. इ. त्याचवेळी पुरूषाने शुचिर्भूत होऊन देव ताम्हनात काढावेत, देवघर स्वच्छ पुसावे आणि पूजा करावी.

मला देवपूजा करणे अगदी अलिकडेच (का कॊण जाणे पण) interesting वाटायला लागले आहे. मी अगदी शास्त्रोक्त पद्धतीने देवपूजा करतो असं नाही पण जसं जमेल, जेवढं जमेल, तेवढं करतो. पूजा करताना एक देवांबद्दल एक वेगळाच भाव उत्पन्न झाला आहे. म्हणजे असं की एखादी मूर्ती किंवा फॊटो हातातून चुकून खाली पडला तर मला ठेच लागल्यासारखे वाटते. त्या मूर्तीला/फॊटॊ ला छातीशी घट्ट कवटाळून डोळे गच्च मिटून घेतो अन देवाची क्षमा याचना करतो. माझ्या हातून पुन्हा असं होऊ देणार नाही असं म्हणतो.
मी देवांशी बोलतो सुद्धा! देवीला दागिने घालताना विचारतो "दागिने व्यवस्थित बसले ना?" किंवा कुंकू लावल्यावर विचारतो "डोळ्यात तर नाही ना गेलं आई?" देव पुसताना विचारतो "खसाखसा पुसलं नाही ना?" श्री स्वामींच्या फोटॊ ला अत्तर लावल्यावर विचारतो "खूप अत्तर लागलं का हो स्वामी?" माझ्या या प्रश्नांची ते काय उत्तरे देतात ते तेच जाणे. मी आपली पूजा करत असतो.

मला असं वाटतं की देवघर हे घरातल्या चैतन्याचं स्त्रोत आहे. घरातलं चैतन्य, उत्साह, आनंद, प्रसन्नता, शांति या सगळ्यांचं स्त्रोत म्हणजे देवघर...
माझी तर अशी जबरदस्त भावना आहे की जर देवपूजा पूर्ण भक्ती भावाने केली तर ते भाव देवांपर्यंत पोचतात अन मग त्याचे रुपांतर चैतन्य, उत्साह, आनंद, प्रसन्नता, शांति याच्या झऱ्यात होतं. ते घरात पसरतं. एखादी उदबत्ती लावल्यावर तिचा सुगंध सगळ्या घरात पसरतो तसेच देवघर हे उदबत्ती चे काम करते.

माझं तर असं स्वप्न आहे की माझ्याकडून अशी रोज पूजा व्हावी की संपूर्ण घर प्रसन्नतेने, शांतीने भरून जावं. घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते जाणवावं. त्या व्यक्तीला शांत अन आल्हाददायक वाटावं. प्रसन्न वाटावं.

हे स्वप्न जेव्हा पूर्ण होईल ते होवो पण माझा प्रयत्न चालू आहे.