बुधवार, नवंबर 08, 2006

देवघर....

आपल्या घरात अनेक खोल्या असतात. कोणाला बैठक आवडते, कुणाला बेड तर कुणाला स्वैपाकघर..

मला विचाराल तर मला देवघर आवडते....

देवघराची वेगळी अशी खोली क्वचितच असते. कुणाचे देवघर स्वैपाकघरात तर कुणाचे त्याच्याबाजूला तर कुणाचे चक्क बेडरूम मध्ये... कुठेही असो पण देवघर असणे महत्वाचे. पण ते नुसतेच असून चालत नाही तर देवपूजा करणारा ही लागतो.

असं म्हणतात की घरातल्या कर्त्या पुरूषाने देवपूजा करावी अन कर्त्या स्त्री ने त्याला मदत करावी म्हणजे पूजेची तयारी करावी. फुले आणावीत, हार करावेत, गंध काढून ठेवावे, नैवेद्याचे पदार्थ करावेत, उदबत्ती, निरांजन, वाती, कापूर, धूप इ. काढून ठेवावेत, पूजेची भांडी स्वच्छ धुवून ठेवावीत इ. इ. त्याचवेळी पुरूषाने शुचिर्भूत होऊन देव ताम्हनात काढावेत, देवघर स्वच्छ पुसावे आणि पूजा करावी.

मला देवपूजा करणे अगदी अलिकडेच (का कॊण जाणे पण) interesting वाटायला लागले आहे. मी अगदी शास्त्रोक्त पद्धतीने देवपूजा करतो असं नाही पण जसं जमेल, जेवढं जमेल, तेवढं करतो. पूजा करताना एक देवांबद्दल एक वेगळाच भाव उत्पन्न झाला आहे. म्हणजे असं की एखादी मूर्ती किंवा फॊटो हातातून चुकून खाली पडला तर मला ठेच लागल्यासारखे वाटते. त्या मूर्तीला/फॊटॊ ला छातीशी घट्ट कवटाळून डोळे गच्च मिटून घेतो अन देवाची क्षमा याचना करतो. माझ्या हातून पुन्हा असं होऊ देणार नाही असं म्हणतो.
मी देवांशी बोलतो सुद्धा! देवीला दागिने घालताना विचारतो "दागिने व्यवस्थित बसले ना?" किंवा कुंकू लावल्यावर विचारतो "डोळ्यात तर नाही ना गेलं आई?" देव पुसताना विचारतो "खसाखसा पुसलं नाही ना?" श्री स्वामींच्या फोटॊ ला अत्तर लावल्यावर विचारतो "खूप अत्तर लागलं का हो स्वामी?" माझ्या या प्रश्नांची ते काय उत्तरे देतात ते तेच जाणे. मी आपली पूजा करत असतो.

मला असं वाटतं की देवघर हे घरातल्या चैतन्याचं स्त्रोत आहे. घरातलं चैतन्य, उत्साह, आनंद, प्रसन्नता, शांति या सगळ्यांचं स्त्रोत म्हणजे देवघर...
माझी तर अशी जबरदस्त भावना आहे की जर देवपूजा पूर्ण भक्ती भावाने केली तर ते भाव देवांपर्यंत पोचतात अन मग त्याचे रुपांतर चैतन्य, उत्साह, आनंद, प्रसन्नता, शांति याच्या झऱ्यात होतं. ते घरात पसरतं. एखादी उदबत्ती लावल्यावर तिचा सुगंध सगळ्या घरात पसरतो तसेच देवघर हे उदबत्ती चे काम करते.

माझं तर असं स्वप्न आहे की माझ्याकडून अशी रोज पूजा व्हावी की संपूर्ण घर प्रसन्नतेने, शांतीने भरून जावं. घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते जाणवावं. त्या व्यक्तीला शांत अन आल्हाददायक वाटावं. प्रसन्न वाटावं.

हे स्वप्न जेव्हा पूर्ण होईल ते होवो पण माझा प्रयत्न चालू आहे.

3 टिप्‍पणियां:

बेनामी ने कहा…

mehshA,

Masta vAtalA lekha.
miya roja devapuja karataya paNa TI kharacha kartya purushaane aravi asacha mala pana vaaTata. tasa tara aamchya ghari aaeecha roja puja karate pana gharatala pratyekajana kimaana ekadatari devachya paya padatocha aani puja kelyavara aae, vaidla aani mothya vyakatiMchya pana.

Rup

बेनामी ने कहा…

Chhaan watla ha lekh vachun. devgharacha ek photo pan post kela tar ajoon chhan vatel
Eve

aruna22kar@gmail.com ने कहा…

cchan vatal ha devabaddalche tumache mat vachun kharacha kay ho aaplya hatun devala lagat asel kay ho?